ठाणे - भिवंडी शहरात धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंडमध्ये एक तीन मजली इमारत आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास कोसळली. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.
आज पहाटेच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जणांचा बळी गेला तर १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, 782 धोकादायक इमारतींपैकी 210 इमारत अतिधोकादायक असून आज दुर्घटना घडलेली जिलानी इमारत त्यामधीलच आहे. याबाबत आव्हाड म्हणाले, ही इमारत अतिधोकादायक होती. अशा प्रकारच्या इमारतींमध्ये नागरिकांनी राहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. यापुढे धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हाताला धरून बाहेर काढावे लागले, अन्यथा अशी जीवितहानी टाळता येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
९०च्या दशकानंतर ठाण्यात अनेक अनाधिकृत बांधकामे करण्यात आली मात्र, बांधकामे करताना सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याच गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आज या जुन्या इमारती सामान्य नागरिकांसाठी जीवाला धोकादायक ठरत आहेत. येथे क्लस्टरची योजना राबवण्याची गरज आहे. त्यासाठी काय पावले उचलावीत, याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, यासाठी नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. सोबतच कुठलीही वास्तू बांधताना त्याची व्यवहार्यता बघणे महत्वाचे आहे, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
तीन वर्षांत भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनेत कालपर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 42 जण जखमी झाले होते. त्यामुळे शासनाने दखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचा निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने कारवाई झाल्याचे कागदावरच दाखवून इमारतींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! भिवंडीत 782 इमारती धोकादायक; लाखो नागरिकांच्या जीवाला धोका