ठाणे - ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात उपचार घेत असतानाही आपले नियमित काम ते रुग्णालयातून करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांना २४ सप्टेंबरला कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात असताना कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे आपल्यामुळे अडून राहू नये, म्हणून त्यांनी रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाने विळखा घातला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिरावल्यानंतर पालकमंत्री यांनी कुठलेही काम प्रलंबित राहता कामा नये याची जबाबदारी स्वीकारून रुग्णालयातूनच पुन्हा कामाला सुरुवात केली. शिंदे यांनी रुग्णालयातूनच विविध प्रस्तावाच्या फाईलवर सह्या करण्याचे काम सुरू केले आहे. पालकमंत्री आजारी पडले म्हणून कुठलीही लोकोपयोगी कामे अडकून राहता कामा नये म्हणून कागदपत्रांचे अवलोकन आणि स्वाक्षऱ्या रुग्णालयातून केल्या जात आहेत.
दरम्यान, आपली प्रकृती ठिक असून लवकरच जनसेवेसाठी पुन्हा रुजू होणार असल्याचा निर्धार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.