नवी मुंबई - लग्न जुळवणाऱ्या साईट्सवरुन 30 पेक्षा अधिक सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या तरूणाला रबाळे पोलिसांनी गजाआड केले आहे. हा तरुण उच्चशिक्षित असून, त्याची अगोदर दोन लग्नं देखील झालेली आहेत. सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे असे या भामट्याचे आहे. रबाळे पोलिसांनी त्याला बलात्कारासह, फसवणुकीच्या गुह्याखाली अटक केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील दहरेंजा या गावातील सचिन रहिवासी आहे. त्याने लग्न जुळवणाऱ्या साइट्सवरुन 30 हुन अधिक उच्चशिक्षीत तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून तसेच त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन त्यांचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे असे दोन नावाने हा भामटा वावरत होता. रबाळे पोलिसांनी त्याला बलात्कारासह, फसवणुकीच्या गुह्याखाली अटक केली आहे. सचिनने फसविलेल्या 16 तरुणींनी अतापर्यंत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्याच्याकडून फसल्या गेलेल्या तरुणींची संख्या मोठी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आरोपी सचिन पाटील उर्फ सचिन सांबरे हा विवाहित असतानाही त्याने स्वत:ला कधी अविवाहित, तर कधी घटस्फोटित, तर कधी घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मॅट्रिमोनियल साईटवर टाकली होती. त्या माध्यमातून त्याने लग्नास इच्छुक असलेल्या सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात ओढले होते. दिसायला देखणा असल्याचा फायदा उचलत सचिनने तो रसायन शास्त्रामध्ये एम. एससी. आणि मार्केटिंग एमबीए, जपानी कंपनीत सेल्स मॅनेजरचे पद, पगार पाऊण लाख असल्याची माहिती लग्न जुळवणाऱ्या साईटवर टाकली होती. तसेच कधी अविवाहित तर कधी घटस्फोटित असल्याचे तो भासवत असल्याने त्याच्या मोहजाळात लग्नाळू मुली सहज अडकत होत्या. त्यामुळे त्याने लग्नास इच्छुक असलेल्या तरुणींच्या विश्वासाचा, त्यांच्या भोळेपणाचा आणि वैयक्तिक वा घरगुती समस्यांचा गैरफायदा घेऊन त्यांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली होती.
अशाच पद्धतीने त्याने वर्षभरापुर्वी नवी मुंबईत राहणाऱ्या एका वकील तरुणीला मॅट्रिमोनियल साइटवरुन आपल्या जाळ्यात ओढले होते. तिला आपली फसवणूक झाल्याचे कळले, तेव्हा या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यातून त्याने 30 लग्नाळू मुलींना फसवल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे रबाळे पोलिसांनी सचिनने फसवलेल्या पीडित तरुणींनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.