नवी मुंबई - राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. आरक्षण रद्द झाल्याने, मराठा बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज मराठा समाजाच्या वतीने वाशी टोल नाक्यावर रास्तारोको करत, निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला. न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने, त्याचे पडसाद आज राज्यभरात उमटताना दिसत आहेत. वाशी टोल नाका येथे रास्तारोको करत, मराठा आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे वाशी टोल नाक्यावर वाहनांची रांग लागल्याचे पाहायला मिळाले, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - माणुसकी ओशाळली! भररस्त्यात महिलेला पतीच्या मृतदेहासह सोडून ड्रायव्हरचा पोबारा