ठाणे - राज ठाकरे यांना कोहिनूर मिलप्रकरणी ईडीची नोटीस आल्याने पहिल्यांदा ठाण्यात त्याचे पडसाद उमटले. राज यांना चौकशीसाठी बोलावले, तर ठाण्यात कडकडीत बंद पाळला जाईल. तसेच यामध्ये जे दुकानदार सहभागी होणार नाहीत त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा धमकीवजा इशारा ठाणे पालघर मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठलाही गोंधळ घालू नये, यासाठी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी लोकांना त्रास होईल म्हणून बंद मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वातावरण काहीसे निवळले. आज २२ जुलैला राज ठाकरे ईडी चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते गोंधळ घालतील, या भीतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सकाळपासूनच ठाण्यातील मनसे नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. अविनाश जाधव यांना नौपाडा पोलीस, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष डोके, विनायक रणपिसे यांना ठाणे नगर पोलीस, तर ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे शहर उपाध्यक्ष विश्वजित जाधव यांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मनसेच्या फायरब्रँन्ड नेत्या तसेच महिला सेना उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांना देखील कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतरही अनेक पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.
सरकारची ही दडपशाही असून आम्ही सरकारला अजिबात घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली. मनसेच्या नेत्याला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देखीला त्यांनी यावेळी दिला.
ठाण्यात मनसेचे बस्तान -
ठाणे हा सुरुवातीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, आता याठिकाणी मनसेने आपले बस्तान बसवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश द्यावे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी, असेच चित्र मनसेच्या स्थापनेपासून दिसत आहे. परप्रांतियांविरुद्ध झालेल्या आंदोलनाची सुरुवात देखील ठाण्यातूनच झाली होती.