मीरा भाईंदर - ठाणे जिल्ह्यातील काशीमीरा पोलिसांनी लॉकडाऊनमध्येही सुरू असलेल्या मानसी ऑर्केस्ट्रा डान्स बारवर छापा टाकला. यावेळी काशीमीरा पोलिसांनी ७ पीडित मुलींची सुटका केली. तर २१ ग्राहक व हॉटेल चालकांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या तक्रारीनंतर आज (15 मे) पालिकेने संपूर्ण हॉटेल जमीनदोस्त करण्याची कारवाई केली, अशी माहिती मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमध्ये खुलेआम छमछम
संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनांवर बंदी आहे. मात्र मीरा भाईंदरमध्ये धक्कादायक बाब समोर आली. मागील आठवड्यात काशीमीरा हद्दीतील मानसी ऑर्केस्ट्रा डान्स बार सुरू असल्याची माहिती काशीमीरा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये ऑर्केस्ट्रा डान्स बार सुरू असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी ७ बारगर्ल्स, 1 तृतीयपंथी आणि तब्बल 21 ग्राहकांना ताब्यात घेतले. काशी मीरा पोलिसांनी ७ बारगर्ल्स व 1 तृतीयपंथी यांची सुटका केली. तर चालकासह 21 ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल केला.
अनधिकृत हॉटेल असल्याचे उघड
कडक लॉकडाऊन काळात खुलेआम चक्क ऑर्केस्ट्रा डान्स बार सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसमोर एकच प्रश्न निर्माण झाला. मीरा भाईंदर परिमंडळ-१चे सहायक पोलीस आयुक्त विलास सानप यांनी पालिकेला पत्र देऊन या हॉटेलची माहिती मागवली. हॉटेल अधिकृत आहे की अनधिकृत? याबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी पालिकेने पत्राद्वारे हे हॉटेल अनधिकृत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तत्काळ हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या कारवाईची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. कारण मीरा भाईंदर शहरात अनेक अनधिकृत लॉजिंग, हॉटेल, बार आहेत. मात्र त्यावर पोलीस पालिका प्रशासन कानाडोळा का करत आहे? असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
पोलिसांच्या मदतीने हॉटेल जमीनदोस्त
'पोलिसांनी या हॉटेलबाबत माहिती मागवली होती. आम्ही तसा पत्रव्यवहार नगररचना विभागाशी केला. त्यानंतर हे हॉटेल अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. अखेर आज संपूर्ण हॉटेलवर तोडक कारवाई करण्यात आली. हे हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले. यापुढेही अशा अनेक अनधिकृत बांधकामवर कारवाई सुरूच राहील', अशी माहिती मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.
हेही वाचा - प्रेमविवाह केल्याने तरुणीसमोर नवऱ्याचा डोक्यात घातली फरशी, व्हिडिओ झाला व्हायरल