नवी मुंबई - कोरोना विषाणूचा आंबा व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट 15 एप्रिलपर्यंत टळले नाही, तर आंबा व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोसळणाऱ्या पावसाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे. आताही आंब्याच्या मोसमात कोरोनामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी गुढी पाडव्याला बाजारात आंब्यांची रेलचेल दिसणार नाही.
गुढीपाडवा आला की, बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होते. बदललेल्या वातावरणामुळे यंदा आंब्याचे फक्त 40 टक्के उत्पादन झाले आहे. वातावरण बदला सोबतच आता कोरोना विषाणूचा फटका आंबा व्यापारांना बसत आहे.
हेही वाचा - कोरोना : निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून
हवाई मार्गे आंब्याची होणारी निर्यात सध्या पूर्णपणे बंद आहे. समुद्री मार्गे दुबई आणि तेथून पुढे रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये होणारी निर्यातही पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट 15 एप्रिलपर्यंत दूर व्हावे, अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.