ठाणे - चोरट्यांच्या धाकापायी अनेक गृहिणींचा नकली दागिने वापरण्याकडे कल असतो. त्यातच एका महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत चोरट्याने गळ्यातील नकली मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील वालधूनी परिसरातल्या आदर्श कॉलनीत घडली आहे. या प्रकरणी अनिता रत्नाकर दोंदे (वय 45 वर्षे) या गृहिणीच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिवसा ढवळ्या अशा प्रकारच्या चोऱ्या होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले ( Thane Crime ) आहे.
किचनमध्ये भांडी धुत असताना घडला प्रकार - सोमवारी (दि. 7 मार्च) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही अनिता या किचनमध्ये भांडी धुत होत्या. इतक्यात एक 20ते 25 वर्षे वयाचा बदमाश घराच्या गॅलरीतून आतमध्ये आला. चाकूचा धाक दाखवून या बदमाशांने अनिता यांच्या गळ्यातील 500 रुपये किंमतीचे बेंटेक्सचे मंगळसूत्र खेचून गॅलरीतून उडी मारून पळ काढला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा - Criminal Arrested Ulhasnagar : पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी 22 वर्षानंतर गजाआड