ठाणे - राज्यमंत्र्याच्या नावाने फोन करून पोलिसांवर दबाव टाकू पाहणाऱ्या एका भामट्या नवरोबाचा कल्याण तालुका पोलिसांनी भांडाफोड केला आहे. नितीन जाधव असे या नवरोबाचे नाव असून कल्याण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी नितीन जाधवचे त्याच्या पत्नीशी वाद सुरु होते. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी नितीन याने चक्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या नावाने फोन करत पोलीसांवर दबाव टाकल्याचे समोर आले आहे.
कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी बालाजी पांढरे यांच्या मोबाईलवर फोन करून एक व्यक्ती मी ठाणे जिल्ह्याचा भाजप अध्यक्ष बोलतोय असे म्हणायचा. तर कधी कल्याण तालुक्याचा अध्यक्ष बोलतोय असे बोलून, आरोपी जाधव याचे प्रकरण निकाली काढा असे सांगायचा. गुरुवारी पोलीस अधिकारी पांढरे यांना पुन्हा फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी राज्यमंत्री कांबळे बोलतोय, नितीन जाधव याचे पेंडींग प्रकरण निकाली काढा. तुम्ही काय केले आम्ही तुमच्यावर कारवाई करू. पनवेलला तुम्ही पोलीस का नाही पाठवले असा दम भरला.
बोलण्यावरून पोलीस अधिकारी पांढरे यांना संशय आला. मात्र जाधव याचे नेमके काय प्रकरण आहे. हे शोधण्यासाठी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. पोलिसांनी तत्काळ आरोपी नितीन रहात असलेल्या वाहुली गावात जावून त्याचा शोध घेतला. त्यावेळी तुम्हाला राज्यमंत्र्याचा फोन आला म्हणून तुम्ही आलात, असे नितीन त्यांना म्हणाला. नितीनचे आपल्या पत्नीशी वाद होते. त्याचे प्रकरण पनवेल येथे सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
पोलिसांनी नितीन जाधवला घेवून पुन्हा पोलीस ठाणे गाठले. याबाबत पांढरे यांना माहिती दिली. पांढरे यांनी ज्या नंबर वरून फोन आला त्या नंबर वर पुन्हा फोन केला. तेव्हा आरोपी जाधवचाच मोबाईल खणाणला जाधवने मोबाईल उचलला व त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवत त्याची चौकशी केली असता, नितीन जाधव राज्यमंत्र्याच्या नावाने फोन करत असल्याचे उघड झाले. याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी बालाजी पांढरे यांनी नितीन जाधव याला अटक केली असून, त्याने अनेक जणांना अशा प्रकारे फोन केले असल्याची महिती उघड झाली असल्याचे सांगितले.