ठाणे - मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथून गावठी कट्टा विकण्यासाठी डोंबिवलीत आलेल्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला असून नरेंद्र रामप्रसाद कौशल असे या आरोपीचे नाव आहे.
लॉकडाऊनमध्ये पैशाच्या कमतरतेमुळे हा आरोपी गावठी कट्टा विकण्यासाठी डोंबिवली शहरात आला होता. तर हा गावठी कट्टा उल्हासनगर-5 मधील बंटी नावाच्या व्यक्तीला विकण्यासाठी आपण डोंबिवलीत आणल्याची माहिती आरोपी नरेंद्र याने पोलिसांना दिली आहे. ठाणे पोलीस आयुक्त परिसरात विनापरवाना शस्त्र बागळण्यास मनाई करण्यात आलेली असताना हा मनाई आदेश झुगारून आरोपी नरेंद्र रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन जवळ गावठी कट्टा विकण्यासाठी आल्याची माहिती पोलीस नाईक चंद्रकांत शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी नरेंद्र हा डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळ ग्राहकांची वाट पाहत थांबल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी करून त्याची झाडाझडती घेतली. त्याच्याकडे काडतुसे आणि गावठी देशी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे.
दरम्यान, पोलीस चौकशीत त्याने लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळेच हा गावठी देशी बनावटीचा कट्टा विकण्यासाठी इथपर्यंत आल्याचे पोलिसांना सांगितले. तर दुसरीकडे ग्राहक बंटी याचा पोलीस शोध घेत असून जमिनीचा वाद असल्याने त्याला हा गावठी कट्टा हवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर आरोपी नरेंद्र त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.