नवी मुंबई - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचा मौसम संपल्यानंतर जुन्नरच्या हापूस आंब्याचा मौसम सुरू झाला आहे. मात्र, या आंब्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला असून, मोठ्या प्रमाणावर हा आंबा गळून गेला आहे. 25 जूनपर्यंत हा आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार होता. मात्र, आंबा गळून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा व्यापारी व आंब्यांच्या शौकीनांना आता जुन्नर हापूसला मुकावे लागणार आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याचा मौसम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरला की, नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्नर हापूसचे वेध लागतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरातील आंब्याची आवक एमपीएससी बाजारात सुरू झाली आहे. 10 जूनपर्यंत जुन्नरचे आंबे मोठ्या प्रमाणावर सुरू होणार होते. 20 ते 25 जूनच्या दरम्यान, हे आंबे मुंबई, नवी मुंबई, तसेच इतर ठिकाणी आंबे प्रेमींना खाण्यासाठी उपलब्ध होणार होते. मात्र, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील वडज, येणेरे, बेलसर, पारुंडे, काले, निरगुडे तसेच आपटाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या बागा आहेत. शेतकऱ्याने वर्षभर जोपासलेले हे फळ नेमके बाजारात विक्री करता पाठवण्याच्या हंगामातच गळून पडले आहे. या आंब्याला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट तसे मुंबई बाजारात व परदेशात मोठी मागणी आहे. या जुन्नर हापूसचे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता हापूसप्रेमींना जुन्नर हापूसला मुकावे लागणार असल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.