ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणताही नेता आपल्या विजयाची खात्री देऊ शकत नाही. त्या नेत्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे नाव पुढे आले, तर नवल वाटायला नको. अजित पवार यांचा गट राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने जितेंद्र आव्हाड यांचे पक्षातील वजन वाढले आहे. मात्र, असले तरी दुसरीकडे त्यांना आपला मतदारसंघ राखण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे.
आव्हाडांची डोकेदुखी वाढणार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडताच अजित पवार यांनी जाहीर व्यासपीठावरून आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे गट शिवसेनेतून फुटला असतानाही श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना लक्ष्य केले होते. आता हे दोन्ही गट जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एकत्र मोर्चेबांधणी करत असल्याने आव्हाडांची डोकेदुखी वाढणार हे नक्की.
जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला : जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला हेही अजितदादांच्या गटात सामील झाल्याने जितेंद्र आव्हाड यांना बालेकिल्ला वाचवणे कठीण झाले आहे. संधी दिल्यास कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत नजीब मुल्ला यांनी दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. मात्र, कळवा मुंब्रा मतदारसंघात कोणाचीच मक्तेदारी नसल्याचे सांगत नजीब मुल्ला यांनी जाहीरपणे आपली इच्छा व्यक्त केली.
कळवा मुंब्रा मुस्लिम बहुल परिसर : मुस्लिमबहुल असलेल्या कळवा मुंब्रा मतदारसंघातील चार नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने आव्हाड यांचे बळ काही प्रमाणात कमी झाले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांचा गट जितेंद्र आव्हाड यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. गेल्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड ७५ हजार ६३९ मतांनी विजयी झाले होते. मात्र, त्यांच्या विरोधात आता नदीम मुल्ला यांनी शड्डू ठोकून उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आव्हाड यांच्यापुढील वाट तितकीशी सोपी नसणार आहे.
बैठकांचे सत्र सुरू नियुक्त्या लवकरच : नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वांना एकत्र आणून दुफळीचे राजकारण संपविण्याबाबत थेट चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आहे. आता आम्ही मोकळे आहोत, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले. पूर्वी आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही, पण आता आम्ही आनंदी आहोत. आगामी निवडणुकांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, कळवा मुंब्रा हे आमचे हक्काचे ठिकाण आहे. उमेदवार कोणीही असला, तरी निवडणूक लढवणारच, अशी ठाम भूमिका नजीब मुल्ला यांनी घेतली आहे.
हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटपासाठी जोर; विस्तार रखडणार?