नवी मुंबई - बेलापूर रायगड भवन येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिघा नवी मुंबई येथील भंगार व्यावसायिकांवर प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्यांना ७२ तासात प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका व महावितरण यांना पाणी व वीजपुरवठा खंडीत करून कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
दिघा संजय गांधी नगर येथील भंगार व्यावसायिक शगीर अहमद शबीर खान याचा भंगार व्यवसाय आहे. ते भंगारमध्ये आलेले प्लास्टिक व इतर वस्तूंवर प्रक्रिया केल्यानंतरचे रासायनिक द्रव पदार्थ शेजारील नाल्यामध्ये सोडत असे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चक्कर येणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या येत होत्या.
हेही वाचा - भिवंडीच्या कवाड यात्रेत रंगतोय १२५ वर्षांपासून कुस्तीचा फड; नामवंत मल्लांचा सहभाग
धुरामुळे प्रदूषण होत असल्याने येथील रहिवाशांनी नवी मुंबई पालिका प्रदूषण मंडळ यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार आरटीआय कार्यकर्ते ब्रिजेश मिश्रा यांनी प्रदूषण मंडळाकडे यासाठीचा पाठपुरावा केला. नंतर प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. एएन हर्षवर्धन यांनी भंगार व्यावसायिक शगीर अहमद शबीर खान यास ७२तासाची मुदत देऊन कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संकेतही दिले असल्याचे ते बोलताना म्हणाले. तसेच याविषयी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांना विचारले असता या संदर्भात माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू असे गवते यांनी सांगितले.
हेही वाचा - कल्याण-मुरबाड महामार्गावर अपघात; 1 ठार, 1 गंभीर