ठाणे - संपूर्ण जगासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे पाच महिन्यांपासून नाभिक व्यावसायिकांना केश कर्तनालयाची दुकानेदेखील बंद ठेवणे भाग पडले. या काळात कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कौटुंबिक विवंचनेतून राज्यात १६ नाभिक व्यावसायिकांनी आत्महत्या केली. कोणी विषारी औषध घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या आत्महत्यांमध्ये नवनाथ साळुंखे (वय ३५, रा. इरळी,ता.कवठेमहाकाळ, जि. सांगली), दीपक तुळशीराम महोकार (वय ४३ रा. शनवारा ता. आकोट जि. अकोला), स्वप्निल चौधरी (वय ३० रा.दुर्गापूर जि. चंद्रपूर) रामदास कडूकर (वय ५८ ता. मोरगाव जि. यवतमाळ), शांताराम श्रावण शिरसाठ (वय ४२ रा. शिरपूर जि. धुळे), अशोक बानक (वय ३५ रा. डबकी, ता.देवरी, जि. गोंदिया), सतिश मनोहर धानोरकर (वय ३५ रा. तिवसा जि. अमरावती), रामराव चांदूरकर (वय ५५ रा. खानापूर ता.मोर्शी जि.अमरावती), दिलीप बाबुराव कापसे (वय ५१ रा. यादवनगर ता. पाचपावली जि. नागपूर), बबन सूर्यवंशी (वय ४५ रा. निमगाव ता.अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया), केशव वसंता वाटकर (रा. दारोडा ता. हिंगणघाट जि. वर्धा), खंडू बाबूराव पंडीत (रा. हिवरा ता. बूम जि. अहमदनगर), शैलेश यशवंतराव लक्षने (वय ४० रा. बैलतरोडी (पिवळी),जि. नागपूर), मनोहर नास्नूरकर (वय ५१ रा. पार्वतीनगर, नागपूर, जि. नागपूर), चंद्रकांत कोंडीराम दळवी (रा. इस्थळ ता.केज जि.बीड), मयूर नरेश जाधव रा.कांबे ता. भिवंडी जि.ठाणे) आदींचा समावेश आहे.
हेही वाचा - वर्ध्यात रागाच्या भरात रुग्णवाहिका पेटवली; चालकावरही चाकूने हल्ला
या आत्महत्याग्रस्त पीडितांची राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. कर्ता पुरूष गेल्याने त्यांच्या कुटुंबाची अवस्था बिकट आहे. या कुटुंबांना राज्य शासनाने महिना १५ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे सरचिटणीस महेंद्र (मयूर) जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रश्नासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आवाज उठवून आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जाधव यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे.
हेही वाचा - बापरे..! गणेशोत्सवासाठी एकत्र जमलेल्या 40 नातेवाईकांपैकी 32 जणांना कोरोनाची लागण