ठाणे - नागरिकत्व कायदा सावरकारांच्या विचार विरोधी आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर मुख्यमंत्र्यांना सावरकरांचे कोणते विचार माहिती आहे, अशी खिल्ली भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भांडारी यांनी उडवली आहे. तसेच त्यांना कोण विचारणार असा टोमणाही त्यांनी लगावला. कल्याण येथील ओक हायस्कुलमध्ये ३१ व्या अखिल भारतीय स्वा. सावरकार संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते 'सीएबी आणि एनआरसी समज, गैरसमज' या विषयावर व्याख्यान देत होते. यावेळी व्यासपीठावर सावरकार अभ्यासक सच्चिदानंद शेवडे, कर्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रभाकर संत उपस्थित होते.
हेही वाचा - 'हिंदू महासभा-मुस्लीम लीग हे तर ब्रिटिशांचे चमचे'
भंडारी पुढे म्हणाले, देशभर नागरिकत्व कायदा लागू केल्याने विरोधक रस्त्यावर उतरले. मात्र, हेच विरोधक यापूर्वीही अनेकवेळा या कायदयात दुरुस्त्या झाल्या, त्यावेळी का नाही उतरले? केवळ दोषापोटी भाजपला बदनाम करण्यासाठी विरोधक मुस्लिम आणि अन्य धर्मियांना भडकवून मतांचे ध्रुवीकरण करत असल्याची टीकाही त्यांनी केली. व्याखानाच्या शेवट त्यांनी दिल्लीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल आणि काँग्रेसकडे मुद्दे नसल्याने त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोध नागरिकांची माथी भडकवून दंगली घडवीत असल्याचा आरोप केला.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या घराबाहेर आंदोलन
दरम्यान, माधव भंडारी यांनी अर्ध्या तासाच्या व्याख्यानात सीएबी आणि एनआरसी कायदयाचे समज, गैरसमज विषयी प्रमुख मुद्दे मांडून या कायद्याचे समर्थन केले. यावेळी कल्याण-डोंबिवलीतील सावरकर प्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तर अनेक शाळांमधील विद्यार्थांसाठी सावरकारांच्या जीवनावर विविध स्पर्धा स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशन तर्फे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम ते तृतीय आलेल्या विद्यार्थांचा सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.