ठाणे - सप्टेंबर महिन्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ऑगस्ट महिन्यातील संख्येपेक्षा अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात १० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, शहरातील हॉटस्पॉटची संख्या आता कमी होऊन ती १८वरून ११ वर आली आहे. आता या हॉटस्पॉटमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम असणार, असे महापालिकेने आपल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले.
जिम आणि व्यायाम शाळा सुरू करण्याची परवानगी देखील पालिका प्रशासनाने दिली आहे. दीर्घ लॉडाऊनंतर महापालिका प्रशासनाने टाळेबंदी शिथिल करत सर्वच बाजारपेठा आणि दुकाने सुरू केली होती. तर, १८ प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर करून येथे टाळेबंदी कायम ठेवली होती. ३१ ऑक्टोबरला लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून ११ प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर करत याठिकाणी ३० नोव्हेंबरपर्यंत हॉटस्पॉट ठेवण्याचे नवे आदेश काढले आहेत.
अनेक परिमंडळ अजूनही रडारवर
परिमंडळ एकमध्ये १ हॉटस्पॉट आहे, तर परिमंडळ दोनमध्ये ६, परिमंडळ ३ मध्ये ४ हॉटस्पॉट आहेत. हे हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी राज्य शासनाच्या 'मिशन बिगीन' अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत राहतील, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा- कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुबाडणाऱ्या तिघांना अटक; 8 वर्षांपूर्वीच्या चोरीचाही लागला छडा