ठाणे : आज सकाळी अंबरनाथ रेल्वेस्थानका दरम्यान लोकल रुळावरून घसरली. सायडिंगला असलेली लोकल मेन लाईनला येत असताना हा प्रकार घडला. पावणे दोन तास सेवा विस्कळीत होती. या दुर्घटनेमुळे लोकमान्य टिळक – विशाखापट्टणम ही डाऊन मार्गावरची एक्स्प्रेस अंबरनाथ स्थानकावर थांबवण्यात आली होती. तर, डाऊन मार्गावरून धावणारी बदलापूर लोकल आणि अंबरनाथ लोकल उल्हासनगर येथे थांबवण्यात आल्या होत्या. दरम्यान, कल्याण ते बदलापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. मात्र बदलापूर ते कर्जत मार्ग कार्यरत आहे. तर, अप मार्गावरील कर्जत ते कल्याण विभागही कार्यरत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
अंबरनाथ रेल्वे अपडेट : कल्याण कर्जत रेल्वेसेवा सुरू झाली. एलटीटी विशाखापट्टणम एक्स्प्रेस कर्जतच्या दिशेने रवाना झाली आहे. हळूहळू संपूर्ण रेल्वेसेवा पूर्वपदावर येणार आहे. रुळावरून घसरलेली लोकल उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकलचे कर्जत मार्गावर असलेले डब्बे बाजूला करून कर्जत मार्ग खुला करण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
मध्य रेल्वेचे प्रसिद्धीपत्रक : कल्याण ते कर्जत दरम्यानची डाउन वाहतूक प्रभावित झाली आहे. ट्रेन 18520 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम एक्सप्रेस अंबरनाथ स्टेशन होम सिग्नलवर थांबवली आहे. एक डाउन बदलापूर लोकल- उल्हासनगर स्थानकावर रोखण्यात आली आहे. एक डाउन अंबरनाथ लोकल- उल्हासनगर स्टेशनच्या होम सिग्नलवर रोखून धरली आहे. डाउन कल्याण ते बदलापूर विभाग ब्लॉक आहे. डाउन बदलापूर ते कर्जत विभाग कार्यरत आहे. अप कर्जत ते कल्याण विभाग कार्यरत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा :