ठाणे : शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, साने हा गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांना खायला घालत होता. जे यापूर्वी त्याने कधीही केले नव्हते. या गुन्ह्यामागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, असे नया नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. पीडित सरस्वती वैद्य (३६) ही रेशन दुकानात काम करणाऱ्या सानेसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये होती. ती मागील तीन वर्षांपासून मीरा रोड पूर्व येथील गीता आकाशद्वीप इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहत होती.
गडबड वाटल्याने पोलिसांना फोन : पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी साने यांच्या फ्लॅटमधून एका शेजाऱ्याला दुर्गंधी येत होती. त्याला दुर्गंधीबाबत विचारले असता तो घाबरलेला दिसला. त्यानंतर तो काळ्या रंगाची सॅक घेऊन बाहेर पडला आणि त्याने रात्री 10.30 वाजेपर्यंत परत येणार असल्याचे शेजाऱ्याला सांगितले. मात्र, शेजाऱ्यांना काहीतरी गडबड वाटल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. सानेच्या फ्लॅटच्या आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा फ्लॅटमधून असह्य वास येत होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. बेडरूममध्ये त्यांना प्लास्टिकची पिशवी आणि रक्ताने माखलेली करवत आढळून आली; पण पोलीस जेव्हा स्वयंपाकघरात घुसले तेव्हा ते थक्क झाले.
बादल्यांमध्ये आढळले मांस : किचन प्लॅटफॉर्मवर पोलिसांना प्रेशर कुकरमध्ये आणि काही भांड्यात महिलेचे केस तसेच जमिनीवर पडलेले उकडलेले मानवी मांस आढळले. अर्धी जळालेली हाडे आणि मांस सिंकमध्ये, बादल्या आणि टबमध्ये ठेवण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. शेजार्यांच्या म्हणण्यानुसार, साने गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत होते. जे त्यांनी यापूर्वी पाहिले नव्हते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सानेने बहुधा 4 जून रोजी सरस्वती वैद्य हिची हत्या केली आणि शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. आपल्या लिव्ह-इन पार्टनरने आत्महत्या केल्याचा दावा करून साने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा: