ठाणे - जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ येथे शनिवारी पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आज पावसाचा जोर कमी झाला असून शनिवारच्या पूरस्थितीनंतर आज पाणी ओसरले आहे. मात्र, तरीही कल्याण-डोंबिवलीत जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. शनिवारी माजलेल्या पावसाच्या हाहाकारानंतर अनेकांच्या घरांमध्ये आणि दुकानात अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे आपली कामे सोडून आता घराची डागडुजी आणि साफसफाई करण्याचे काम कल्याण-डोंबिवलीकरांना करावे लागत आहे.
बदलापूरमध्ये झालेल्या पूरस्थितीमुळे आजूबाजूच्या गावांना आणि कल्याण-डोंबिवली शहराला देखील याचा मोठा फटका बसला. विजांचा कडकडाट आणि पावसाचा मारा इतका प्रचंड होता की, सगळे नागरिक भयभीत झाले होते. पाऊस सुरू होताच ओढ्यांना आलेला पाण्याचा मोठा लोंढा अनेक गावांत शिरला. यामध्ये बहुतेकांची घरे जलमय झाली. तर काहींच्या घरात तब्बल साडेपाच फूट पाणी साठले होते. अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू ओढ्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्या आहेत. तसेच मार्केटमधील दुकानांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड होऊन चिखल साचला आहे. तर लोकांना रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली.
शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे कल्याणच्या पुढील रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती. ही परिस्थिती शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होती. म्हणून मध्य रेल्वेकडून रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड अपडाऊन ब्लॉक घेण्यात येणार आहे.