ठाणे - सामाजिक संघटना स्थापन करून स्वतःला समाजसेवक म्हणून घेणाऱ्या खंडणी बहाद्दराला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली. लकी उर्फ कारी माखिजा (वय ५१) असे या आरोपीचे नाव आहे. माखिजाच्या तीन साथीदारांना यापूर्वीच पोलीस पथकाने अटक केली आहे. या खंडणीखोरांच्या टोळीचा सूत्रधार लकी माखिजा हा फरार होता.
या प्रकरणातील तक्रारदार राजू उर्फ राजेश इदनानी यांनी उल्हासनगर परिसरात बेवस चौक येथे बांधकाम उभारले होते. विश्व् सिंधू सेवा संगमचा पदाधिकारी असलेल्या आरोपी शेरू गंगवानी, मुख्य आरोपी लकी माखिजा, धनश्याम तलरेजा, मोहन अस्कारानी यांनी संगमत करून या बांधकामाची तक्रार उल्हासनगर पालिकेत केली. हे बांधकाम तोडून टाकण्याबाबतचा तक्रार अर्जही त्यांनी दिला होता.
हेही वाचा - आफ्रिकन चित्ता भारतात येणार? सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील
त्यानंतर राजेश इदनानी यांना बांधकाम तोडण्याची तक्रार मागे घेण्यासाठी या खंडणीबहाद्दर चौकडीने ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती राजेश इदनानी ३० हजार रुपये देण्यास तयार झाले. जर खंडणी दिली नाही, तर गुंडा करवी मारण्याची धमकीही आरोपींनी राजेश इदनानी यांना दिली.
तक्रादार राजेश इदनानी यांनी ठाणे खंडणी पथकाशी संपर्क करून या चार आरोपींसह इतर दोन साथीदारांची नावे तक्रार अर्जात दिली. यानुसार २२ जानेवारीला उल्हासनगर बस स्थानकाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये सापळा लावून तीन आरोपींना ३० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार लकी माखिजा हा फरार होता. शनिवारी ठाणे खंडणी पथकाने त्याला गुजराथच्या सीमेवरून अटक केली. माखिजा याला विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खंडणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एम. टी. कळमकर करत आहेत.