ठाणे : हर हर महादेव हा चित्रपट बंद करण्यासाठी ठाण्यात मोठा वाद झाला. ठाण्यात चित्रपटांवरून वाद निर्माण होणे ही गोष्ट नवी नसून या सेन्सॉरच्या प्रकाराला तीस वर्षांचा इतिहास असल्याचे समोर आले आहे. बॉम्बे, यदाकदाचित, माय नेम इज खान, वस्त्रहरण, मी नथुराम गोडसे ह्या नाटक-सिनेमांनिमित्त ठाण्यात मागील 30 वर्षापासून अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याचे मुख्य कारण ठाण्यात असलेल्या राजकीय नेत्यांची सेन्सॉरशीप हे आहे. काही चित्रपटांच्या वेळी जाणून बुजून वाद निर्माण करायचा आणि त्यानंतर फुकटची प्रसिद्ध मिळवायची आणि मोठा गल्ला कमवायचा ही एक पद्धत मागच्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाली आहे. यासाठी राजकीय सुपारी देखील दिली जाते, असे प्रकार देखील याआधी पाहायला मिळाले असल्याचे जेष्ठ पत्रकार कैलास म्हापदी यांनी सांगितले.
आनंद दिघे यांनी केली ठाण्यात सुरुवात - बॉम्बे सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा ठाणेकरांना पाहायला मिळाला नाही. कारण या सिनेमांमध्ये दाखवलेले दृश्य हे देशविरोधी आहेत, असा आरोप करत आनंद दिघे यांनी हा सिनेमा ठाण्यात रिलीज होऊन दिला नाही. धर्मवीर आनंद दिघे यांनी मी नाथूराम गोडसे बोलतोय या नाटकाचा विरोध सुरू असताना विरोध करणाऱ्यांना चोप चोपून नाटक पुढे चालवलं. त्याच्यापुढे यदाकदाचित या विनोदी नाटकाला झालेला विरोध हा फार मोठा विरोध समजला जात होता आणि याच नाटकाच्या निमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे बॉम्बस्फोट देखील करण्यात आला होता.
जितेंद्र आव्हाड यांचा विरोध - नथुराम मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला जितेंद्र आवड यांनी विरोध केला होता. तो अपवाद वगळता मणिकर्णिका माय नेम इज खान असे अनेक चित्रपट ठाण्यात विरोधाला बळी पडले.
हर हर महादेव चित्रपटावरून वाद - नुकताच प्रदर्शित झालेला हरहर महादेव या सिनेमाला राष्ट्रवादीने विरोध केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलेला आहे. एकूणच हा विरोधाभास लक्षात घेऊन सिनेमा रिलीज झाल्यानंतर सात दिवसांनी का विरोध केला असा आरोप मनसेकडून केला जात आहे. तर दुसरीकडे या सिनेमांमध्ये काही आक्षेपार्य दृश्य दाखवल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे.
दहा हजार प्रयोगानंतर विरोध - नाट्यसृष्टी मधले वस्त्रहरण या नाटकाचे दहा हजार प्रयोग झाल्यानंतर हे नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता आणल्यानंतरही अशाप्रकारे होणारा विरोध आणि त्याच्या ठाण्यातले जुने नाते हे ठाण्यातल्या सेन्सॉरशिप वर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे.
वादग्रस्त दृश्य टाळावीत - सिनेमा किंवा नाटक हे अतिरंजीत करून दाखवल्याने त्याला प्रेक्षक मिळतात, असा आजही काही लोकांमध्ये समज आहे. त्यामुळे रियल स्टोरी असलेले अनेक सिनेमे देखील अतिरंजीत झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळेच वाद निर्माण होतात.