ठाणे - पावसाने आज पुन्हा कहर करीत शहापूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे कसारा घाटातील महामार्गात पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील रुळावर पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प आहे.
मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील उंबरमाळी स्थानकात रेल्वे ट्रॅकमध्ये 3 फूट पाणी भरले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल ट्रेन कसारा व खर्डी,आठगाव, स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून शहापूर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. याचा फटका रेल्वे मार्गाबरोबर आता रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली आहे. नाशिककडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे सदस्य शाम धुमाळ व त्यांची टीम मदत कार्य करत आहे. तसेच कसारा पोलीस ही घटनास्थळावर पोहचले आहेत.
पाऊसाचा कहर-
शहापूर तालुक्यात पाऊसाने कहर केला आहे. अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. तर रेल्वे ट्रॅकवरदेखील पाणी आले आहे. कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तसेच आता मुंबई-आग्रा महामार्गावर ललित कंपनी समोरील संपूर्ण महामार्गाच पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचे शुटिंग, नाना पटोलेंचा आरोप