ठाणे - मित्रासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तडीपार गुंडावार उल्हासनगर शहरातील कॅम्प नं-२ परिसरात भर रस्त्यावर तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून चाकू हल्ला केला. गंभीर जंखमी झालेल्या गुंडावर क्रीटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर त्रिकुटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान निकम असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तडीपार गुडांचे नाव आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ तेजुमल चक्की परिसरात समाधान निकम हा गुंड राहतो. त्याला मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड जिल्हातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपार शिक्षेचा भंग करून तो शहरात सर्रासपणे राहत असल्याचे उघड झाले. गुरुवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या सुमारास तो मित्र राहुल वंजारी याच्या सोबत कॅम्प नं-२ परिसरात कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी कपडे खरेदी करून बाजारामधून बाहेर आल्यानंतर आरोपी पियूष, रोहित व नारायण घरटे यांनी जुन्या भांडणाच्या रागातून समाधान निकम याला शिवीगाळ, मारहाण करून चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निकम याला शहरातील क्रीटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. राहुल वंजारी यांच्या तक्रारीवरून तिंघा विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
हेही वाचा - बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्हैय्या आणि आव्हाडांची गुप्त बैठक, माध्यमांशी बोलणे टाळले
दरम्यान, हल्ल्याबाबत माहिती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी यांना समजल्यावर क्रीटीकेअर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या समाधान निकम यांच्यावर तडीपार गुन्ह्याचा भंग केल्याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वीच मध्यवर्ती पोलिसांनी एका तडीपार गुंडाला तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी अटक केली. पोलीस परिमंडळातून तडीपार केलेल्या गुंडाची चौकशी केली. तर बहुतांश गुंड परिमंडळ हद्दीत सर्रासपणे राहत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यांना राजकीय व पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चाही होत असून पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका वठवित आहेत, अशी टीका सर्वस्तरातून होत आहे.