नवी मुंबई- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे वसाहती मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने कामोठे वसाहत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे. हा महत्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला आहे. या कंटेनमेंट झोनची घोषणा झाल्यानंतर कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली लाँग मार्च काढून नागरिकांना या संदर्भात माहिती देण्यात आली.
कामोठेचे क्षेत्रफळ 2.76 चौ.किमी आहे. लोकसंख्या 1.13 लाख आहे. सद्यस्थितीत महानगरपालिका क्षेत्रात 156 पैकी 61 कोरोनाबाधित रूग्ण हे एकट्या कामोठ्यात आढळून आले आहेत. कामोठे परिसरातील परिस्थिती पाहता कामोठयाबाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी संबधित भाग प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी ज्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे त्या भागातील इमारती सील करण्यात येत असत. परंतु, कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी लाँग मार्च काढून नागरिकांना या संदर्भात माहिती दिली.