ठाणे - एमएसआरडीसी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगावातील रस्त्यावर 'पाणीचं पाणी' साचल्याचे चित्र आहे. वाहनचालक गुडघाभर पाण्यातून आपली वाहने मार्गस्थ करीत आहेत, यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे कोन ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांकडे गेल्या तीन महिन्यात तब्बल 10 ते 12 वेळा पत्रव्यवहार केला. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची साफसफाई, रस्त्यावरील बंद अवस्थेतील लाईट दुरुस्ती, तसेच रस्त्यावर साचलेला कचरा साफ करण्याची मागणी केली.
मात्र गेल्या तीन महिन्यापासून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामाकडे एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वेळेतच रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची सफाई न केल्याने त्यात कचरा साचला व पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. एमएसआरडीसी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही समस्या उदभवल्याचा आरोप कोन ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
दरम्यान, गुरूवारी संध्याकाळपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कोन ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी धाव घेऊन, सकाळपासून साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून पाण्याला वाट करून दिली. तर या मार्गावरील दिवसभर वाहतूक कोंडी राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.