ठाणे - 'बाबुल की दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैके की कभी न याद आए, ससुराल में इतना प्यार मिले', हे गाणे मिश्किल शैलीत गाऊन आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचे निवडणुकीच्या मैदानात स्वागत केले.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आव्हाड आणि सय्यद एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी वेळे अभावी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न करू शकल्याने आव्हाडांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेने रातोरात शिवबंधन बांधून दीपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभे केले.
हेही वाचा- जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार अर्ज दाखल
दीपाली सय्यद यांनी मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने त्यांच्या लोकप्रियते सोबतच जातीचे कार्ड चालवण्याचा डाव शिवसेनेकडून टाकण्यात आला आहे. हा कितपत यशस्वी होईल हे 24 तारखेला कळेलच, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहिणीचे मानवी धर्माप्रमाणे यथासांग औक्षण करू, खूप माया देऊ आणि त्यानंतर दिड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठवण्याची व्यवस्था जनतेकडूनच केली जाईल, असेही आव्हाड म्हणाले.