नवी मुंबई - गणेश नाईकांना कोरोनाचा ब्रँड अॅम्बेसेडर करा, असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुळवडीला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर सडकून टीका केली.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने युवक मेळाव्याचे आयोजन करून रणशिंग फुंकले आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली देखील काढण्यात आली.
यावेळी आव्हाड म्हणाले, गणेश नाईक हे रेती व उद्योगधंद्यांमधील खंडणी वसूल करणारे आहेत. त्यांनी स्वतः ला मोठे केले. परंतु, दुसऱ्या कोणालाही मोठे होऊ दिले नाही. नवी मुंबईतील राजकारणामध्ये आमदार मंदा म्हात्रे व विजय चौगुले यांनी गणेश नाईकांमुळेच राष्ट्रवादी सोडली. एवढेच नाही तर गणेश नाईक यांनी आपल्या मुलाच्या तिकिटावर स्वतः उभे राहून त्याचा राजकीय बळी घेतल्याची खोचक टीका देखील आव्हाडांनी केली.
महापालिका निवडणुकीआधी भाजपवासी झालेले दिघातील 3 नगरसेवक येत्या 12 तारखेला शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असा खुलासाही आव्हाड यांनी केला. तसेच राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या इतरही अनेक नगरसेवकांनी परत यावे, असे आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले.