ठाणे - शहरातील सर्वात मोठी आणि जुनी असलेली खारटन परिसरातील जवाहर बाग स्मशानभूमी आता स्थानिकांची डोकेदुखी झाली आहे. याठिकाणी दररोज सरासरी 12 ते 15 मृतदेह दाहिनीमध्ये जाळली जात आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेल्या चिमणीची उंची अतिशय कमी असल्याने या स्मशानात जाळण्यात येणाऱ्या कोरोनाच्या आणि इतर शवांचा धूर थेट आजुबाजूच्या इमारतींमध्ये व चाळींमध्ये जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार पाठपुराव होऊनही प्रशासनाने काहीच कारवाई केलेली नाही.
ठाणे महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एकट्या जवाहरबाग स्मशानभूमीत मार्च ते 15 जुलै या 135 दिवसांत 1 हजार 275 प्रेतांवर अंत्यसंस्कार केले गेले. यापैकी दफन केलेल्या प्रेतांची संख्या 25 आहे. स्मशानाच्या चारी दिशांनी मनुष्यवस्ती, मोठमोठे टॉवर, शाळा, मंदिर, कॉलेज व झोपडपट्टी पसरली आहे. येथील दाहिनीच्या चिमणीची उंची अतिशय कमी आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर नवीन चिमणी आणण्यात आली मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून नवीन चिमणी खालीच गंज खात पडली आहे.
स्मशानभूमीचा इतिहास -
थेट पेशवाई काळात सुरू झालेली ही स्मशानभूमी दोन दंगली, स्वातंत्र्य युद्ध, दोन मोठ्या महामाऱ्या आणि अनेक मोठ्या अपघातांची साक्षीदार आहे. शहरातील मृतदेहांसोबतच शासकीय रुग्णालयातील बेवारस मृतदेहांची या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. या ठिकाणची बाजारपेठ, पुरातन कोपीनेश्वर मंदिर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर, ऐतिहासिक मामलेदार कचेरी, पीडब्ल्यूडी इमारत, जिल्हा परिषद आणि शिवकालिन हिराकोट किल्ल्याचा समावेश असलेला हा परिसर मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. जवळ-जवळ 90 टक्के ठाणे शहर या एकाच स्मशानावर अवलंबून असून आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त मृतदेहांवर या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेले आहेत.
मोठ्या लोकसंख्येचा परिसर याच स्मशानभूमीवर अवलंबून -
सिडको स्टॉप, स्टेशन, जांभळी नाका, चरई ते थेट गोकुळनगर, साकेत, राबोडी, श्रीरंग, वृंदावन, खोपट, चंदनवाडी, पाचपाखाडी, नौपाडा असा विस्तीर्ण परिसर याच स्मशानभूमीवर अवलंबून आहे. घोडबंदरातही स्थानिक नागरिक बाहेरच्यांना आपल्या स्मशानात येण्यासाठी विरोध करतात म्हणून तीही प्रेते थेट जवाहर बागला येतात. सध्या या स्मशानभूमीमुळे येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला. मात्र, तरीही या समस्यांपासून रहिवाशांची सुटका झालेली नाही. आता कोरोनाची व्याप्ती लक्षात घेता लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.