ठाणे - कोळी बांधव दरवर्षी खाडीमध्ये नारळ टाकून नारळीपौर्णिमा साजरी करतात. मात्र, शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी ठाण्यातील 'जाग' या संस्थेच्याच्या वतीने चक्क खड्ड्यात नारळ टाकून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्व्हिस क्रिटीकेअर रुग्णालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले.
ज्याप्रमाणे खाडीत नारळ टाकून तिला शांत होण्याची विनंती केली जाते. त्याच पद्धतीने, खड्ड्यांमध्ये नारळ टाकून एकही बळी घेऊ नको, अशी विनंती यावेळी आंदालनकर्त्यांनी खड्ड्यांना केली. शहराच्या विविध भागात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे शहरात वाहतुक कोंडी होत आहे. काही दिवसांपूर्वी महापौरांनी यासंबंधी पाहणी दौराही केला होता. तेव्हा खड्ड्यांमुळे वैतागून त्यांनी दौरा अर्ध्यावर सोडून तेथून काढता पाय घेतला होता. येत्या रविवारी शहरात 'वर्षा मॅरेथॉन' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ठाणोकरांच्या कररुपी पैशातून चांगले रस्तेही पालिकेला देता येत नाहीत का, असा सवाल 'जाग' संस्थेने यावेळी उपस्थित केला.
जाग संस्थेचे संस्थापक संजय मंगो यांनी यावेळी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. स्मार्ट शहरांच्या नावाखाली भरपूर निधी खर्च केला जातो. मात्र, प्रशासनात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो. त्यामुळेच प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही, असा आरोपही मंगो यांनी केला. अर्ज आणि निवेदने देऊन प्रशासनाला जाग येत नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी अशा अनोख्या पद्धतीने आंदोलन केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गावठाण कोळीवाडे समितीचे पदाधिकारी हर्षद भोईर, अंकिता भोईर यांच्यासह प्रदीप इंदुलकर, मिलिंद गायकवाड, अनुपकुमार प्रजापती आदी उपस्थित होते .