ठाणे - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्याने राजकीय नेत्यांना पक्षांतराचे वेध लागले आहेत. यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग सुरु आहे. तरीही, पक्षांतराबाबत शिवसेनेने नरोवा कुंजरोवा भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सध्या पक्षांतरावर कोणीच बोलू नये, कोण कुठे जाईल आणि कोण मधल्यामध्ये लटकेल ? काही सांगू शकत नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पक्षांतराचा पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संजय राऊत शनिवारी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ठाण्यात आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी,खासदार राऊत यांच्यासह पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, खासदार कुमार केतकर, विवेक पंडित, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर, शिवसेना उपनेते अनंत तरे, साहित्यिक प्रवीण दवणे मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा-शिवसेनेत 'इन्कमिंग' चालूच; मुंबई-ठाण्यात विरोधकांना धक्का
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला संपुर्ण महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. तसेच तरुणपणी बाळासाहेब जसे फिरायचे तसाच माहोल सध्या असून यात्रेत लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या पक्षांतरबाबत राऊत यांना छेडले असता,आगामी विधानसभा निवडणुकीत पुढील आठ दिवस उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षांतरावर कोणीही बोलु नये, कोण कुठे जाईल, कोण कोठून येईल आणि कोण मधल्यामध्ये लटकेल काही सांगू शकत नाही, असे स्पष्ट करुन अधिक भाष्य करणे टाळले. त्यामुळे एकीकडे शिवसेनेत दुसऱ्या पक्षातील नेत्यांची घाऊक भरती सुरु असताना पक्षांतराबाबत सेनेने चक्क नरोवा कुंजरोवा भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.