ठाणे - खंडणीच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात अटकेत असलेला कुख्यात गँगस्टर इकबाल कासकरला आज(शुक्रवार) ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. परंतु, हा प्रशासनाचा डाव असून त्यांनी कोर्टाच्या आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप इकबालच्या वकिलांनी केला आहे.
गेले अनेक दिवस इकबालला यकृताचा त्रास होत असून त्याला उपचारासाठी मुंबईचे जे.जे अथवा सेंट जॉर्ज रुग्णालयात भर्ती करावे, अशी मागणी त्याचे वकील विशाल इंगोले यांनी कोर्टात केली होती. त्यावर कोर्टाने तुरुंगातील डॉक्टरांना तपासणी करून अहवाल देण्यास सांगितले होते. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यास हरकत नसल्याचा अहवाल दिला होता. परंतु, त्याच्या वकिलांनी जे.जे किंवा सेंट जॉर्जेमध्येच उपचार व्हावेत असा अर्ज केला होता. कोर्टाने तो मान्य करत तुरुंग प्रशासनाला तसे आदेश दिले होते.
मात्र, आज तुरुंग प्रशासनाने त्याच्या छातीत दुखत असल्याचे कारण देत कासकरला ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात भर्ती केल्याने वकिलांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली आहे. इकबालला जो आजार आहे त्यावर उपचार न करता भलत्याच आजाराची चाचणी सिव्हील रुग्णालयातील डॉक्टर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तुरुंग प्रशासनाने कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नसून कोर्टाचा तुरुंग प्रशासनावर अवमान याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.