ठाणे- झणझणीत मटणाचा रस्सा, सुकी कलेजी, चिकन, फिश फ्राय आणि सोबत भाकरी, काय एवढे सगळे पदार्थ पाहून तोडांला पाणी आलेना? पण हे पदार्थ घेताना ग्राहकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आपण मटण, चिकन यासारखे पदार्थ खरेदी करताना काळती घेतो का? म्हणजे ते ताजे आहेत का, खाण्यास योग्य आहेत का? याची पूर्ण खात्री करूनच ते खरेदी करावेत. कारण अनेकवेळा शिळे चिकन आणि मटण ग्राहकांना विकले जात असल्याचे समोर आले आहे.
ठाणे महापालिकेकडून 4 हजार 200 चिकन, मटण विक्रेत्यांना परवाना देण्यात आला आहे. पालिकेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्वच्छतेबाबत काही नियम देखील घालून देण्यात आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. या व्यवसायिकांना परवाना देण्याचा अधिकार जरी महापालिकेला असला तरी, विकण्यात येणारे मटण, चिकन हे ताजे आहे का? खाण्यास योग्य आहे का? हे तपासण्याचा अधिकार मात्र महापालिकेला नाही. ती जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असते. पालिकेकडून केवळ हे विक्रेते कोरोनाच्या नियमांचे पालन करत आहेत की नाही? एवढेच पाहिले जाते. त्यामुळे शिळे मटन व चिकन विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने, बाजारपेठेत सर्रासपणे शिळे मटण व चिकन विकले जात आहे. हे मानवी आरोग्यसाठी धोकादायक आहे.
बोट फ्लायमुळे रोगराईचा धोका
चिकन किंवा मटण ताजेच शिजवले पाहिजे. पण जास्तीत जास्त दोन दिवस शिळे मटण सेवनासाठी चालू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वास्तविक मांस अनेक तास उघड्यावर राहिले तर त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा मांसावर ‘बोट फ्लाय’ नावाच्या माश्या बसतात अशा मटणाच्या सेवनामुळे आजाराची शक्यता वाढते.
उघड्यावर मटण विक्री करणाऱ्यांवर कारवाई नाहीच
ठाण्यात अनेक ठिकाणी उघड्यावर मटण विकले जाते, मात्र या विक्रेत्यांवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत नियम मोडणाऱ्या किती विक्रेत्यांवर कारवाई केली याची नोंद देखील महापालिकेकडे नाही.