ठाणे - भाजीपाल्याच्या पिकअप टेम्पोमध्ये नाशिकवरून मुंबईला विक्रीसाठी जाणारे सुमारे दीड हजार किलो गोमांस भिवंडी ग्रामीण पोलिसांनी जप्तकरून चालकासह एकाला अटक केली आहे. वसीम सत्तार अत्तार (रा. मंडई चौक नाशिक) समीर निजामउद्दीन शेख (रा. गणेशनगर नाशिक) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे मार्च २०१५ पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रक, टेम्पोमधून इतर जिल्ह्यासह परराज्यात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.
नाशिकवरून केली जात होती जनावरांच्या मांसाची वाहतूक
भिवंडी तालुक्यातील मुबंई - नाशिक महामार्गावर वडपे पोलीस चौकीजवळ पोलिसांनी २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नाकाबंदी केली होती. यावेळी एका टेम्पोत (टेम्पो क्रमांक ,एम. एच. ४८ ए. जी. १३२८) गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन तपासणी करीत असतानाच पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमध्ये पोलिसांनी पहाणी केली असता, जनावराचे मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तालुका पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी शेलार यांना घटनास्थळी बोलवून मांसाच्या तुकड्याची तपासणी केली असता गोवंश जनावराची कत्तल केलेले मांस असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर पोलिसांनी बेकायदेशीर जनावरांचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी चालकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
आरोपीकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
गोवंश मांसाची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो ज्याची किंमत १ लाख २० हजार आणि टेम्पोतील १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे गोमांस असा एकूण ३ लाखांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने गाय तसेच गोवंश हत्येला बंदी घातली असतांनाही चोरट्या मार्गाने गोवंश मांसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची बाब भिवंडीत वारंवार समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना कठोर शिक्षेची तरदूत करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.