ठाणे - भिवंडी तालुक्यातील एका वीस वर्षीय तरुणीचे शहरातील फुलेनगर येथील तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी लग्न लावण्यात आले. मात्र, दोन महिने गोडीगुलाबीने नांदवल्यानंतर या नवविवाहितेने आईकडून पैसे आणावेत यासाठी छळ करण्यात आला. आईकडून पैसे आणने शक्य नसेल तर वेश्याव्यवसायकरून पैसे द्यावेत, असा तगादा पती आणि सासरच्या मंडळींनी लावला. या जाचाला कंटाळून नवविवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
५ मे २०१९ ला पीडित तरुणी हिचा आरोपी मनिष याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिने सासरच्या लोकांनी तिला व्यवस्थित वागणूक दिली. त्यानंतर पीडितेला स्वयंपाक, घरकाम येत नाही, अशी कारणे सांगून तिला शिवीगाळ व मारहाण होऊ लागली. पती मनिष याचे लग्नाअगोदर एका मुलीशी प्रेम संबंध असल्याचे फोटो पीडितेला सापडले. याबाबत तिने जाब विचारला असता, आजकाल सगळीकडेच असे प्रकार चालतात, असे सांगून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला सासरच्या मंडळींनी दिला.
हेही वाचा - ठाणे-बेलापूर मार्गावर शिवशाही बसचा अपघात
एका रात्री पती घराबाहेर असताना पीडितेचा सासरा आणि दीर यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबतही सासू आणि नणंद यांना सांगितले असता, याबाबत कोठेही वाच्यता न करण्याची धमकी त्यांनी दिली. त्यानंतर सासरी नांदायचे असेल, तर आईकडून पन्नास हजार रुपये आण किंवा सांगू त्या व्यक्तीसोबत शरीर संबंध करून त्यातून मिळणारे पैसे घरात देण्याची मागणी सासरच्या लोकांनी केली.