मुंबई- आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्ताने आज शिवसेना ठाकरे गटाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, स्वतः उद्धव ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना अंधेरी येथील मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाची अस्मिता मानली जाणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर असल्याने हा मेळावा महत्त्वाचा मानला जातोय. या मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हेदेखील पाहणे तितकंच महत्त्वाचे आहे. मात्र, या सगळ्यात आधी आता शिवसेनेच्या सर्व खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा, अशी पत्रकार परिषदेद्वारे अधिकृत मागणी केली असून, ट्विट करत अभिवादन करण्यापेक्षा बाळासाहेबांना भारतरत्न द्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती : पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत म्हणाले की, "ही पत्रकार परिषद घेण्यासाठी आम्हाला उद्धव ठाकरेंनी पाठवलंय. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आज बाळासाहेब आपल्यात नाहीत. पण या महाराष्ट्राच्या कणाकणात बाळासाहेब आपल्याला पाहायला मिळतात. आपण आज जो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता म्हणतो, हा स्वाभिमान बाळासाहेबांमुळेच शिल्लक आहे. याच कारणास्तव त्यांना मराठी मनाचे मानबिंदू असं म्हटलं जातं. बाळासाहेब हयात असताना जी लोक त्यांना भेटलीत, त्यांच्या संपर्कात आलीत, ते लोक खरंच भाग्यवान आहेत. आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष आहोत. त्यामुळे आम्हीदेखील स्वतःला भाग्यवान समजतो. आज बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी आम्ही कायम त्यांना आमच्यासोबत ठेवलंय," असंही संजय राऊतांनी सांगितलंय.
बाळासाहेबांना भारतरत्न द्या : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "2026 ला बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. इतक्या वर्षात आतापर्यंत शिवसेनेनं बाळासाहेबांसाठी काही मागितलं नाही. पण आता तशी वेळ आलीय. बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी आमच्यासह सर्व हिंदूंची मागणी आहे. खरं तर मागील 12 वर्षांत ही मागणी कधी झाली नव्हती. ही मागणी संसदेत झाली. विधीमंडळात झाली. पण अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन कधी केली नव्हती. राजकारणासाठी मोदी सरकारने अनेकांना भारतरत्न दिलं. पण ज्यांनी या देशातील हिंदूंना, महाराष्ट्रातील लोकांना मराठी म्हणून अस्मिता दिली, त्यांचा खरंच सन्मान करायचा असेल तर बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा," असंही राऊत म्हणालेत.
राम मंदिर बाळासाहेबांची देण : "बाळासाहेब देशातील कोणत्याच पदावर नव्हते. पण त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलंय. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर हिंदुत्वासाठी कोणी लढले असेल तर ते बाळासाहेब ठाकरे होते. जेव्हा देशात कुठेही हिंदूंवर हल्ले झाले, तिथे बाळासाहेब उभे राहिले. या सरकारने बांधलेलं राम मंदिर बाळासाहेबांची देण आहे. भारतरत्न पुरस्काराच्या मागणीसाठी आम्ही कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. कारण हा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. हा पूर्ण अधिकार प्रधानमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांच्या विषय आहे. केंद्र सरकारची एक समिती आहे, ती यावर निर्णय घेते. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी ट्विट करून अभिवादन करण्यापेक्षा बाळासाहेबांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी आज शिवसेनेच्या खासदारांनी केलीय.
हेही वाचाः
'दिल्लीला कोण जास्त मोठी थैली देते, त्यावरुन नेत्यांचं वजन ठरते'; संजय राऊतांचा हल्लाबोल