ठाणे - कळवा मुंब्राचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री त्यांना फोर्टीस रुग्णालयात हलवले. उपचारानंतर आज त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्यांच्या मित्र परिवाराने सांगितले.
कळवा मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात गरीब वस्ती आहे. आव्हाडांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत लॉकडाऊनमध्ये गरीब वस्तीत जावून मोठ्या प्रमाणात मदत कार्य केले. त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आव्हाडांनी स्वतः ला क्वारंटाईन करून घेतले होते. त्यात त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांचे कार्यकर्ते आणि कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.