ठाणे - एकीकडे बुधवारी पहाटेच्या सुमारास अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्ती करताना असताना दुरुस्ती करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड झाल्याने झालेल्या अपघातात एक कामगाराचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. या अपघातामुळे बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे सेवा ठप्प झाली तर मध्य रेल्वे विस्कळीत झाले होती. या घटनेच्या पाठोपाठ दुपारच्या सुमारास कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेली झाडे-झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान कल्याणच्या दिशेने असलेल्या रुळावर हा जेसीबी अडकला होता.
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम -
परिणामी त्यामुळे जवळपास अर्धा तास या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने धाव घेत जेसीबी हटवला. त्यानंतर रेल्वे रूळाची तपासणी करत रेल्वे सेवा सुरू केली. मात्र तरीही डोंबिवलीकडून कल्याणकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. यात प्रवाशांचे मात्र हाल झाले असून या दोन्ही घटनेमुळे मध्यरेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्याचे प्रवाशाने सांगितले.