ठाणे - भिवंडी तहसील अंतर्गत असलेल्या नांदकर गावाच्या हद्दीतील काळू नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. या अवैध वाळू उपसा प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष नदीच्या पात्रातून सक्शन पंपाद्वारे दिवस-रात्र बेकायदेशीरपणे हा वाळू उपसा केला जात आहे. या विरोधात आता भूमिपुत्र एकवटले असून त्यांनी हा अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी केली आहे.
पूल कोसळण्याची शक्यता-
राज्यात सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यावर बंदी आहे. मात्र काळू नदीवर आंबिवली-नांदकरला जोडणारा एक बंद पुलाजवळच हा वाळू उपसा केला जात आहे. या पुलाचे नदीपात्रातील खांब पूर्णपणे मोडकळीस आले आहेत आणि अशातच या पुलाच्या दोन्ही बाजूला सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याने हा पूल अचानकपणे कोसळू शकतो. तसेच हा वाळू उपसा करणारे सर्वसामान्य मजूर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडू शकतात. याकरिता येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन बेकायदा वाळू उपसा तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे.
कारवाईकडे लक्ष-
याबाबत ग्रामस्थ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट घेणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. तर या बेकायदा सक्शन पंपाद्वारे दिवसरात्र वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर भिवंडी तहसीलदार काय कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.