मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहरातील अवैध पार्किंग संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने स्टिंग ऑपरेशन केले आहे. पोलीस अधिकारी, पालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने शहरात अवैध पार्किंग होत आहे. एका बस चालकाने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार
रविवारी २० डिसेंबर रोजी भाईंदर पूर्वेच्या भोला नगरमधील एका चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून पोत्यात बांधून फेकण्यात आले होते. यामुळे शहरातील अवैध बस, ट्रक पार्किंगचा विषय गंभीर झालेला दिसून येत आहे. या अवैध पार्किंग पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू असल्याचे उघड झाले आहे. मुंबईत पार्किंगला जागा नसल्याने मुंबईतील बस मालक मीरा भाईंदर शहरातील सुभाषचंद्र बोस मैदान, रामदेव पार्क रोड, इंद्रालोक परिसर, काशी मीरा या ठिकाणी पार्किंग करत आहेत.
शहरातील अवैध पार्किंगचा वाली कोण?
एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. इतकी मोठी घटना घडल्यानंतर देखील पालिका, वाहतूक विभाग झोपी गेल्याचे दिसत आहे. ईटीव्ही भारतने खरी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि भाईंदर पूर्वेच्या सेव्हन स्वेकेर शाळेलागत बस चालकाचे स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये बस चालकाने धक्कादायक माहिती दिली. राजापूरवरून मुंबईला जाणारी बस पार्किंग भाईंदरमध्ये का? पालिकेच्या रस्त्यात बस उभी आणि ही आमची पार्किंगची जागा आहे, असे म्हणत पालिकेचे अधिकारी पैसे घेतात. पोलिसांसोबत आमची सेटिंग आहे, असे बस चालक म्हणाला. सदर बस चालक ज्या ठिकाणी पार्किंग करत आहेत त्याच ठिकाणी जेवण आणि झोपत आहे. त्यामुळे भविष्यात अधिक मोठ्या घटनेची प्रशासन वाट बघत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापौरांची प्रतिक्रिया
चार वर्षाच्या मुलीसोबत जे घडले अतिशय निंदनीय आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी मी आज पोलीस आयुक्त यांना लेखी पत्र देऊन तातडीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध पार्किंगचा विषय गांभीर्याने घेत ते बंद करता येईल यासाठी पालिका प्रशासनासह वाहतूक विभागाने लक्ष दिले पाहिजे. भविष्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली तर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले, अशी माहिती महापौर जोस्ना हसनाळे यांनी ईटीव्ही भारतला दिली.
हेही वाचा - नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी संकटात - कृषी अर्थतज्ञ डी. नरसिंह रेड्डी
हेही वाचा - लिओनेल मेस्सीकडून 'पेले' सर!...नव्या विक्रमाकडे कूच