ठाणे - शास्त्रीनगर येथील शौचालयाच्या टाकीवरच एका कार्यालयाचे बांधकाम केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या बांधकामाची जागा मालकांनी तक्रार केल्यानंतरही कारवाई केली जात नसल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - २१ गुन्हे करणाऱ्या सराईत चोराला ठाणे पोलिसांकडून अटक
लोकमान्यनगर- सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या शास्त्रीनगर येथे मॉडेल कॉलनी आहे. ही कॉलनी अतिधोकादायक श्रेणीमध्ये आहे. या कॉलनीच्या शेजारीच एक शौचालयाची टाकी आहे. इमारत धोकादायक असल्याने ती रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असतानाच या ठिकाणी काही समाजकंटकांनी हे बांधकाम सुरू केले आहे.
या संदर्भात दिलीप बेंदुगडे यांनी तक्रार केल्यानंतर मॉडेल कॉलनीच्या अध्यक्षांना ठामपणे कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस बजावली आहे. त्यामुळे संबंधितांनी हे बांधकाम सुरूच ठेवले असून या बांधकामाला स्थानिक नगरसेवकांसह अतिक्रमक उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहायक आयुक्त होळकर आणि लिपीक नाखवा यांचे पाठबळ असल्याचा आरोप दिलीप बेंदुगडे यांनी केला आहे. तर, याच इमारतीमधील रहिवाशी रवींद्र वंजारी यांनी, हे बांधकाम सुरू झाल्यामुळे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या बांधकामासाठी शौचालयाची टाकीचा वापर केला जात असल्याने ही इमारत लवकरच कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते, असे सांगितले.