ठाणे - ठाण्यातील वेदांत रुग्णालयात प्राणपणाने आपली सेवा बजावणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने भरती करण्यात आले होते. त्यांच्यापासून त्यांचे आई-वडील, पत्नी व मुलगी अशा सर्वांनाच या रोगाची लागण झाली. त्यांच्या वडिलांना ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल येथे भर्ती केले असता काल त्यांचे दुर्दैवी निधन झाले. मात्र, हॉस्पिटलने त्यांचे साडे पाच लाखांचे बील काढले तर आईचे साडे तीन लाखांचे बील काढले. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कानावर ही बाब पडताच त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन आयुक्तांशी चर्चा केली व सदरचे भरमसाट बिल माफ करून घेतले.
खासगी रुग्णालये आणि लूट हे एक वेगळेच समीकरण बनले असून, कोरोनाच्या वाढत्या संकटातही रुग्णालये म्हणजे लुटारूंचे अड्डे बनत चालले आहेत. जाधव म्हणाले, मुळात या रोगावर कोणतेही औषध नसताना एवढी मोठी बीले का काढली जातात? असा स्पष्ट सवाल देखील त्यांनी केला. तसेच 'हॉस्पीटलने नियम तोडल्यास आम्ही त्यांना तोडू' असा धमकीवजा इशारा दिला आहे.