ठाणे: मी केवळ हिंदू राष्ट्र स्थापनेची घोषणा केली; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू राष्ट्र ही काळाची गरज असल्याचे मत बागेश्वरबाबा यांनी व्यक्त केले. हिंदू राष्ट्रात इतर धर्माच्या नागरिकांनाही तितकेच महत्त्वाचे स्थान असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धीरेंद्र शास्त्रींचे वादग्रस्त विधान: वर्षभरातच देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून मध्यप्रदेश राज्यातील पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर त्यांचे अनेक राज्यात हनुमान कथाचे प्रवचन होत गेले; मात्र प्रवचन देता वेळी अनेकदा दोन समाजात वाद होईल अशी वादग्रस्त विधाने करून, चमत्कार दाखवून भक्तांना आपल्याकडे आकर्षित करत असल्याचा दावा केला जातो; मात्र या सर्व बाबीचा मोठा खुलासा धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी अंबरनाथमधील पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना केला.
हिंदू राष्ट्रात असेल 'हे' स्वातंत्र्य: बागेश्वर बाबा म्हणाले की, हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास जातीवाद नष्ट होऊन जातीवादी शक्तींना स्थान राहणार नाही. तसेच जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही. हिंदू राष्ट्र झाले तर कोणाही दुसरा धर्म सोडावा लागणार नाही. जो तो आपल्या धर्माप्रमाणे हिंदू राष्ट्रात राहू शकतो, असे मत त्यांनी हिंदू राष्ट्राच्या विधानावर व्यक्त केले.
कृष्ण जन्मभूमी बाबत: हल्ली देवांच्या नावावरच सर्व निवडणुका लढवल्या जातात; मात्र भविष्यात हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर देवाच्या नावावर निवडणूक लढवण्याची गरजच भासणार नाही. केवळ विकासाच्या नावावर निवडणूक लढवल्या जातील अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. देशात हिंदू बहुसंख्य असताना देखील राम मंदिर उभारण्यासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागली. आज एक कृष्ण जन्मभूमी बाबत निर्णय घेता येत नाही, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सनातन हिंदू धर्म वाचवायचा असेल तर शिक्षणासोबत धार्मिक शिक्षणाचीही गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.