ठाणे - पती दारू पित असल्याने त्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वादविवाद होत होता. अखेर या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यांनतर आपले कृत्य उघडकीस येऊ नये याकरिता पत्नीचा मृतदेह बाथरूममध्ये तीन दिवस लपवून ठेवला. अखेर त्या मृतदेहाला दुर्गंधी सुटू लागल्याने आपले कृत्य उघडकीस येईल, या भीतीने पतीनेही गळफास घेऊन स्वत:ला संपवल्याची घटना कुळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी येथे घडली आहे.
वांगणी येथे गेल्या दोन महिन्यांपासून कविता योगेश पंडीत व योगेश पंडीत हे दांपत्य राहत होते. दोन दिवसांपूर्वी पंडीत यांच्या घरातून कुजलेला वास येत असल्याने शेजाऱ्यांनी पंडीत यांच्या घरात खिडकीतून डोकावून पाहिले असता योगेश पंडीत याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती कुळगाव पोलिसांना देताच स.पो.नि. संदीप निगडे, पो.उप.नि. बी.व्ही. सोनवणे आदिंनी त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी योगेश पंडीत याच्या घरात पाहणी केली असता योगेश याने गळफास घेऊन आत्महत्या केले असल्याचे त्यांना दिसून आले. पण त्या घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने याशिवाय योगेश याची पत्नी कविता ही गेल्या तीन दिवसांपासून घरात दिसत नसल्याचे शेजाऱ्यांकडून पोलिसांना सांगण्यात आल्याने कविता हिचाही शोध पोलिसांनी घरात घेतला. त्यावेळी प्रथम खाटेखाली एक मेलेली घुस पोलिसांना मिळाली. ती दुर्गंधी घुशीमुळे सुटली असावी असे त्यांना वाटले. पण पोलिसांनी घरातील बाथरूममध्ये पाहणी केली असता कविता हिचा फुगलेला व अत्यंत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह त्या ठिकाणी पडलेला दिसला. तो मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीचा दिसत होता.
![पत्नीचा खून करून मृतदेह बाथरूममध्ये लपवला; मृतदेहाला दुर्गंधी येताच घाबरलेल्या पतीची आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-6-mardar-2-photo-mh-10007_09052020201553_0905f_1589035553_303.jpg)
दरम्यान, घटनेची माहिती डीवायएसपी शिवपुजे यांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी येऊन दोन्ही मृतदेहांची पाहणी करून पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासाकामी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम कविता व योगेश या दाम्पत्याच्या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घरात बाथरूममध्ये कविता हिचा सडलेला मृतदेह आढळल्यामुळे तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांना येत होता. योगेशने आत्महत्या केली असली तरी कविता हिच्या मृत्युचे नेमके कारण समजण्याकरिता पोलिसांनी तिच्या मृत्युचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांकडून प्राप्त केला. त्यात कविता हिचा गळा आवळून श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना समजले आहे. यावरून योगेशने कविताचा गळा आवळून हत्या करून तिचे प्रेत घरातील बाथरूममध्ये लपवून ठेवले. तब्बल तीन दिवसांनंतर तिच्या मृतदेहाला दुर्गधी सुटल्याने आपले कृत्य उघडकीस येऊ नये व शेजा-यांना आपल्या घरात घूस मेली आहे, हे दाखवण्याकरिता योगशने घरात एक मेलेली घूस खाटेखाली आणून ठेवली. पण कविता हिच्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने आपले कृत्य उघडकीस येणार या भीतीने योगेशने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे तपासात पोलिसांना समजले आहे.
सदर घटनेप्रकरणी पोलिसांनी मृत कविता हिचे वडील सतीश कुलकर्णी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता कविता व योगेश यांच्यात चार ते पाच वर्षांपासून योगेश हा दारू पित असल्याच्या कारणावरून वादविवाद होता. त्यामुळे ते दोघेही वेगवेगळे राहत होते. अलीकडे गेल्या दोन महिन्यांपासून वांगणी येथे राहत होते. २ मे रोजी कविता हिचा वाढदिवस असल्याने योगेशने मोठ्या उत्साहात तिचा वाढदिवस साजरा करून घरात केक कापून शेजा-यांना वाटला होता. दुसऱ्या दिवशी रात्री त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्या दिवसापासूनच कविता गेल्या तीन दिवसांपासून घराबाहेर दिसत नव्हती. याशिवाय त्या घरातून दुर्गंधी येत असल्याने काही जणांनी योगेशकडे विचारपूस सुरू केली होती. त्यानंतर योगेशच्या घराचा दरवाजा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंद असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच्या घरातील खिडकीतून पाहणी केली असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्रकार उघडकीस आला. कविता हिचादेखील मृतदेह त्या घरात सापडला. याप्रकरणी मृत योगेश पंडीतविरुद्ध कुळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बी.व्ही. सोनवणे करीत आहेत.