ठाणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने चाकूने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. विकास शिगवण असे हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, या घटनेनंतर कल्याण पश्चिमेकडील जोशीबाग परिसरात खळबळ माजली आहे.
विकास आणि काजल शिगवण हे दाम्पत्य कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसारत राहतात. विकास हा पत्नी काजल हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांत नेहमी वाद होत होता. रोजच्या भांडणाला वैतागून काजल ही जवळच असलेल्या जोशीबाग येथील लक्ष्मीबाई परदेशी चाळीत राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांकडे राहू लागली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काजलचे आई-वडील कामावर निघून गेले. त्यामुळे काजल घरी एकटीच होती. ही संधी साधत विकास तेथे आला आणि पाठीमागील दरवाजाने तो घरात घुसला. त्यानंतर दरवाजाची कडी लावून त्याने काजलला कोंडले आणि सोबत आणलेल्या चाकूने काजलच्या गळा-छातीवर सपासप वार केले. काजलने विरोध केला असता तिच्या हात आणि मानेवर वार केले. घाबरलेल्या काजलने रक्तबंबाळ अवस्थेत घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विकासने तिच्या पायावर वार केले. तुला जिवंत ठेवणार नाही, तू माझी झाली नाही तर कुणाचीही होऊ देणार नाही, अशीही धमकी दिली. जीवघेणे वार झालेल्या जखमी काजलला परिसरातील रहिवाशांनी तील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सद्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. तशा अवस्थेत तिने दिलेल्या जबाबावरून हल्लेखोर विकास शिगवण विरोधात महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.