ठाणे - वाढत्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहता खबरदारी म्हणून ठाण्यातील 54 खाटांचे जिल्हा शासकीय रुग्णालयाची क्षमता वाढवून 100 खाटांपर्यंत करण्यात येत आहे. यात केवळ कोरोनाग्रस्तांनाच ठेवण्यात येणार असून 20 व्हेंटिलेटरही सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली.
सध्या जगात कोरोनाच्या संक्रमणाला दररोज हजारो लोक बळी पडत आहेत. येणारा काळ हा भारतासारख्या प्रचंड जनसंख्या असणाऱ्या देशासाठी सर्वच अर्थाने कठीण असणार आहे. कारण दुसऱ्या टप्प्यात असणारे संक्रमण तिसऱ्या टप्प्यात जाऊ शकते, अशा इशारा विश्लेषक देत आहेत. ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 64 जण कोरोना बाधित असून फक्त ठाणे शहरात 24 जणांना या विषाणूची बाधा झालेली आहे. येत्या काही काळात हे संक्रमण झपाट्याने वाढले तर येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन तयारी करत आहे. ठाण्यातील 54 खाटांची व्यवस्था असलेले शासकीय रुग्णालय 100 खाटांचे करून त्यात केवळ कोरोना बाधितांनाच ठेवण्याबाबत निर्णय घेतला जात आहे.
एवढ्या बाधितांसाठी जवळपास 20 व्हेंटिलेटरही सज्ज करण्याचे काम सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली आहे. पुरेशा रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा रुग्णालयात तयार ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांनी घाबरू नये पण, सतर्क राहून घरातच बसावे, असे त्यांनी सांगितले. आता हे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याचे दिसत असून जनतेने आता गंभीरपणे विचार करून घरीच थांबले पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती देखील त्यांनी त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनच्या परिस्थितीत आता रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर