ठाणे (भिवंडी) - तालुक्यातील वड ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपनीमधील इजी मेकॅनिकल कंपनीत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला. तसेच चार कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पारसनाथ कंपाऊंड गाळा नंबर b-5 वळगाव येथील जेई मेकॅनिकल कंपनीमध्ये लोखंड कटिंग करण्यासाठी वापरला जाणारा नायट्रोजन गॅस सिलिंडरचा आज दुपारच्या सुमारास स्फोट झाला होता.
दोन कामगारांचा मृत्यू, तर चार जखमी
प्रवीण भोईर (वय 24), अक्षय अशोक गौतम (वय 21) या दोघांचा यात मृत्यू झाला आहे. तर मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन, विवेकानंदा, बजरंग शुक्ला आणि अल्पेश भोईर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली असून, चौकशी सुरू केली आहे. आता चौकशीअंती कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.