ठाणे - तुमच्यासारख्या विठ्ठलामुळे मला आज मंत्रीपद मिळाले,' असे म्हणताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गहिवरून आले. 'लढ म्हणणाऱ्या पवारांनी एकदा मर म्हटले तर मी मरेन,' असे ते पुढे म्हणाले. कळव्यात त्यांनी आज (दि. 26 जानेवारी) शरद पवार आणि संजय राऊत यांचा जाहिर सत्कार ठेवला होता. त्यावेळी मंत्री आव्हाड बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पहिल्यांदा मला कळव्यातून 5 हजार मते कमी मिळाली. त्यानंतर 2014 साली 18 हजांच्या मताधिक्क्यांनी तर यावेळी 36 हजार मताधिक्याने मला कळवेकरांनी निवडून आणले. मी कार्यकर्त्यांच्या भावना म्हणून शरद पवार यांना एक पत्र फॅक्सने पाठवले होते. त्याला त्यांनी पत्राने उत्तरही दिले होते. माझ्या आईला मी ते पत्र सांभाळायला दिले होते. आई गेली. त्यानंतर पत्र मला सापडले नाही. ते पत्र माझ्या आठवणीतील पत्र होते. शरद पवारांनी मला खूप झापले होते. तेव्हापासून मी इतरांशी नीट वागतो, असे म्हणत आव्हाडांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा - 'शिवभोजन थाळी योजना ही क्रांतिकारी सुरुवात'
ईडीच्या नोटशीनंतर मी मोर्चा काढला होता. याला शरद पवारांनी विरोध केला. तरीही या मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आले होते. आराम करण्याच्या वयात त्यांनी अनेक दौरे केले. यामुळे त्यांना 80 वर्षाचा योद्धा म्हणतो, असेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा - नवी मुंबईत एनआरसी, सीएए विरोधात 'संविधान बचाव रॅली'