ठाणे - राज्य शासनाने हॉटेल्स सुरू करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळचे हॉटेल आता खवय्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि ग्राहकांच्या नोंदी ठेवून दर्दी खवय्यांसाठी हे हॉटेल सुरू करण्यात आले असल्याचे हॉटेलचे चालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांनी सांगितले.
तिखट, झणझणीत मिसळ खाण्यासाठी सबंध जिल्ह्याभरातील दर्दी खवय्ये ठाण्यातील तहसील कार्यालयाबाहेरील मामलेदार मिसळ हॉटेलमध्ये येत असतात. मात्र, कोरोनामुळे गेले सहा महिने हे हॉटेल बंद होते. तर, गेल्या महिनाभरापासून या हॉटेलमध्ये पार्सल स्वरुपात मिसळचे वितरण होत होते. मात्र, सायंकाळी सहा-साडे सहा वाजताच हे हॉटेल बंद करण्यात येत असल्याने खवय्यांचा हिरमोड होत होता. लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करून या हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे, या उद्देशाने रचनेमध्ये बदल करून हॉटेल सुरू करण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी खवय्यांच्या नाव-पत्त्याची नोंद केली जात आहे. जेणेकरून एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे सोपे होणार आहे. तसेच, हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टेम्परेचर तपासणी, ऑक्सिजन पातळीची तपासणी, सॅनिटायझेशन आदी सोपस्कार केले जात आहेत. शिवाय, एखादा खवय्या उठून गेल्यानंतर टेबल खुर्ची पुन्हा सॅनिटाईज केली जात आहे, असेही मुर्डेश्वर यांनी सांगितले. दरम्यान, अनेक खवय्यांनी हॉटेलमध्येच बसून मिसळ खाण्यात मजा असल्याची भावना व्यक्त केली. पार्सलला महत्व नाही, असेही ग्राहकांनी बोलताना सांगितले.
हेही वाचा- आरक्षण मिळेपर्यंत एममीएससी परीक्षा रद्द करा, नवी मुंबईत मराठा समाजाची बैठक