ठाणे - वेळ रात्री एकची. ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक १. याच प्लॅटफॉर्मवरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे दिवसभर गाड्या सुटतात. मात्र, जसजशी रात्र होत जाते तसा हा प्लॅटफॉर्म हळूहळू निर्जन होत जातो. अशावेळी होमगार्ड असलेल्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या गणवेशातील असलेल्या होमगार्ड महिलांनी आपली व्यथा मांडली आहे. होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावत असणाऱ्या या महिलांना स्वत:ला मात्र, रेल्वे स्थानकाच्या आवारातच रात्र काढावी लागत आहे. अशावेळी आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल सुवर्णा खरात या महिला होमगार्ड यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -ठाण्यात स्पोर्ट्स बाईक चोर पोलिसांच्या ताब्यात, एक साथीदार फरार
गेल्या अनेक वर्षांपासून सुवर्णा खरात या होमगार्ड विभागात कार्यरत आहेत. दररोज ८.४० ची दादरहून सुटणाऱ्या गाडीत महिला डब्यात कर्तव्यावर असणाऱ्या सुवर्णा यांची अखेरची फेरी ११ वाजून ४० मिनिटांनी ठाणे स्टेशनमध्ये संपते. त्यानंतर सकाळची गाडी थेट ४ वाजून ५५ मिनिटांनी ठाण्यातून असते. अशात रात्र काढण्यासाठी त्या स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जातात. मात्र, तिथून सहकार्य मिळायचं तर सोडाच, थेट तुम्हाला काय करायचं ते करा पण इथे थांबू नका', असं उत्तर मिळतं.
त्यामुळे नाईलाजाने त्या आणि त्यांच्या सहकारी यांना संपूर्ण रात्र चक्क प्लॅटफॉर्मवर काढण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. तिथेच चादर टाकून झोपणे आणि तिथेच डबा खाण्याची वेळ त्यांच्यावर अली.
या परिस्थितिचा सामना करणाऱ्या त्या एकट्या महिला होमगार्ड नाहीत. तर मध्य, हार्बर आणि पश्चिम तिन्ही मार्गावर काम करणाऱ्या ३०० ते ४०० महिला होमगार्डची हीच परिस्थिती आहे. वरिष्ठांना देखील ती चांगलीच ठाऊक आहे. मात्र, गरज पडली तर रेल्वे पोलीस स्थानकाबाहेर ठेवलेल्या बाकड्यावर रात्र काढा, अशी सूचना त्यांना देण्यात येतात.
ठाणे, अंबरनाथ, वाशी आणि सीएसटी स्थानकात महिला होमगार्डना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सध्या प्रसाधनगृहाची देखील सोय नसते. मात्र, त्यावर सगळे मूग गिळून गप्प आहेत.
हेही वाचा - ठाण्यात ओवर हेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प; चाकरमान्यांची तारांबळ
यातील अनेक महिलांची तर अजून लग्नही झालेली नाहीत. अशात प्लॅटफॉर्मवर रात्र काढताना त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी नक्की कोण घेणार हा प्रश्न कायम आहे. महिला होमगार्ड या सर्वप्रथम एक महिला आहेत आणि त्यांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आहे. अशात आपल्या सहकार्यांना पोलीस स्थानकाच्या आवारात आसरा देण्यात गैर ते काय?
एकीकडे आपण महिला सबलीकरनाच्या गप्पा मारतो. महिलांना रेल्वेत सुरक्षा मिळावी यासाठी हक्काने भांडतो. मात्र, ती देणाऱ्या भगिनी रात्री निर्जन प्लॅटफॉर्मवर रात्र काढत असूनही त्याचं कोणालाच काही सोयरसुतक नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यावरच संबंधित यंत्रणांचे डोळे उघडणार का हा प्रश्न पडतो.
एरवी पोलिसांना लागेल ते सहकार्य करू, असे म्हणणाऱ्या सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष एवढ्या सध्या गोष्टीची जबाबदारी घेऊ शकत नाहीत का? रात्रीचे काही तास या महिलांना आपण धड आसरा देऊ शकत नाही, तर एका चांगल्या आणि सुरक्षित समाजाची निर्मिती करण्याची ग्वाही म्हणजे निव्वळ फुकाच्या गप्पाच राहतील.
हेही वाचा -'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'