ठाणे : सिनेमात लॉकअपचे गज वाकवून हिरो पोलीस कोठडीतून बाहेर येतो, असे आपण पाहिले असेल. मात्र, असाच प्रकार सराईत गुन्हेगाराने केल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण तालुका ग्रामीण पोलीस पथकाने फरार झालेला सराईत गुन्हेगाराला एका चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते.
कल्याण तालुक्यात सराईत गुन्हेगारांसाठी लॉकअपची योग्य सुविधा नसल्याने या फरार आरोपीला कल्याण पश्चिम भागातील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमधील लॉकअपमध्ये ठेवले होते. या आरोपीवर राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तब्बल 25 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हा फरार आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पालघर, ठाणे ग्रामीण, नाशिक हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात 25 मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
गज वाकवून पळून गेला- आरोपीला कल्याण तालुक्यातील मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात कल्याण ग्रामीण तालुका पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला महात्मा फुले चौक पोलीस ठाणे जुनी ईमारत मधील लॉकअपमध्ये पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यातच २३ मे रोजी मंगळवारी पहाटे 3:10 वाजल्याच्या सुमारास लॉकअपचे लोखंडी गज वाकवून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला.
भिंतीवरून उडी मारून पसार- दुसरीकडे आरोपी राम हा पळून जात असताना लॉकअपचे पहारेकरी असलेले कल्याण तालुका ठाण्याचे एएसआय रामचंद्र मिसाळ यांनी तसेच इतर पाहारेकरी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र आरोपी सराईत गुन्हेगार हा राम अंधाराचा फायदा घेऊन पोलीस ठाण्याच्या बाजुच्या भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे.
पोलिसांच्या डुलकीतून प्रकार घडल्याची चर्चा- दुसरीकडे सराईत आरोपी पोलीस ठाण्यातील लॉकअपचे गज वाकवून पळून जाईपर्यंत पोलीस काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही फेब्रुवारी २०१६ साली भिवंडीतील अंजूरफाटा येथील एका चोरीप्रकरणी अटकेत असलेले तीन आरोपी चक्क पोलीस कोठडीतून पळून गेल्याची घटना घडली होती. मात्र पोलीस कोठडीतुन आरोपी फरार झाल्याने अब्रु जाण्याच्या भीतीने पोलिसांनी प्रचंड धावपळ करत यापैकी तातडीने दोघांना पकडण्यात यश मिळवले होते. तर तिसराही आरोपी पकडला होता. ड्युटीवरील पोलिसांच्या डुलकीतून हा प्रकार घडल्याची चर्चा पोलीस दलात रंगली होती.
हेही वाचा-